सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा वकिलाचा प्रयत्न


संपूर्ण देशभर संतापाची लाट 

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा वकिलाचा प्रयत्न

सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सुनावणी सुरू असताना एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत या वकिलाला रोखले आणि कोर्टाबाहेर काढले.

‎मिळालेल्या माहितीनुसार राकेश किशोर या वकिलाने सुनावणी सुरू असताना मंचाजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याच वेळी अडवण्यात आले. या दरम्यान तो वकील जोरजोरात आरडाओरडा करत होता आणि  “सनातनचा अपमान सहन करणार नाही”.

‎काही दिवसांपूर्वी खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या नुकसानग्रस्त मूर्तीच्या पुनर्स्थापनेसंबंधी एका जुन्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी केलेल्या एका टिप्पणीमुळे हा वाद निर्माण झाला होता.

‎आजच्या घटनेनंतर सरन्यायाधीश भूषण गवई शांततेने म्हणाले ‎’आम्ही विचलित होत नाही’ कोर्टात इतका मोठा गदारोळ होत असतानाही सरन्यायाधीश गवई शांत होते. या घटनेनंतर ते म्हणाले, “अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरु ठेवा.

‎’मी सर्व धर्मांचा सन्मान करतो’ – सरन्यायाधीश गवईंची भूमिका

‎वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरणही दिले होते. ते म्हणाले होते की, त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. कोणीतरी मला सांगितले की, माझ्या टिप्पणीला सोशल मीडियावर एका खास पद्धतीने सादर केले जात आहे. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया : मी त्यांच्या संयमाचे कौतुक करतो. पंतप्रधानांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी थेट फोनवर संवाद साधून त्यांच्या संयमाचं कौतुक केलं. सोशल मीडियावर पोस्ट करताना मोदी म्हणाले…  सकाळी सर्वोच्च न्यायालयात भारताच्या मुख्य न्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीय स्तब्ध आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृतींना स्थान नाही. न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेला संयम आणि स्थैर्य न्यायव्यवस्थेच्या मूल्यांप्रती त्यांची निष्ठा दाखवते.”

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही या घटनेचा निषेध केला : हा न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे त्यांनी म्हटलं… भारताच्या सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला हा आपल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि संविधानाच्या आत्म्यावर हल्ला आहे. अशा प्रकारच्या द्वेषाला या देशात स्थान नाही.”

प्रियंका गांधींची तीव्र प्रतिक्रिया : हा संविधानावर हल्ला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या,… सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि चिंताजनक आहे. हा केवळ न्यायाधीशांवर नाही, तर संविधान आणि कायद्याच्या राज्यावर हल्ला आहे. अशा कृतींनी लोकशाही कमकुवत होते.”

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा इशारा : द्वेष आणि धर्मांधता वाढली आहे. काँग्रेस अध्यक्ष यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली… ही घटना अभूतपूर्व, लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेवर हल्ला. गेल्या दशकभरात द्वेष, कट्टरता आणि धर्मांधता समाजात कशी पसरली आहे, हे या घटनेतून दिसते. आपल्या न्यायव्यवस्थेची सुरक्षा सर्वोपरि आहे.”

या प्रकारानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे माजी सचिव रोहित पांडेय यांनी तीव्र शब्दांत निंदा केली. त्यांनी सांगितले, “जर कोणत्याही वकिलाने न्यायालयात हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही या कृत्याची तीव्र निंदा करतो आणि योग्य कारवाईची मागणी करतो.”

तसेच सुप्रीम कोर्ट अडव्होकेट्स-ऑन-रिकॉर्ड असोसिएशन (SCOARA) नेही निवेदन जारी करून म्हटले की, “हा प्रकार वकिलाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने या कृत्याचे न्यायालयीन अवमान म्हणून संज्ञान घ्यावे आणि कठोर कारवाई करावी.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!