डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती, “धम्मचक्र अनुवर्तन”


धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिवस 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती, “धम्मचक्र अनुवर्तन”

संकलन :

भदंत एस धम्मसेवक थेरो, वलनी ( कॉलनी ) नागपूर

   

१३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकजवळील येवला येथे मुक्तीभूमीवर धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी जाहीर केले की “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही.”

ही घटना भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जाते, ज्याचा उद्देश सामाजिक समानता आणि न्यायासाठी संघर्ष करणे हा होता.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ची घोषणा ऐकुन संपूर्ण भारतभर नव्हे तर जगातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले डॉ बाबासाहेब आंबेडकर आता कुठला धर्म स्विकरणार अनेक धर्मांची धर्मगुरू , ठेकेदार त्यांच्या कडे येऊ लागले . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कुणालाही दाद न देता या जम्बुदिपातील पवित्र स्थान असलेल्या आणि समानतेचा, शांतता, अहिंसावादी धम्म स्वीकारला आणि नागपूर येथे धम्मदिक्षा जाहीर करण्यात आली

तब्बल २१ वर्षानंतर बाबासाहेबांनी समतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे कोट्यवधी अनुयायांना प्रेरणा मिळाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती, “धम्मचक्र अनुवर्तन”

१३ ऑक्टोबर १९५६ च्या रात्री म्हणजेच १४ ऑक्टोबर च्या पूर्वसंध्येला, बाबासाहेबांना रात्रभर झोप आलेलीच नव्हती… उद्याचा दिवस केव्हा उजाडतो याचीच ते आतुरतेने वाट पहात होते….आयुष्यभर केलेल्या कष्टाचं  उद्या सोनं होणार होतं…आणि एवढ्यातच  बाबासाहेबांना  अचानक डोळा लागतो न लागतो तेवढ्यात पुन्हा थंड्यागार वा-यांच्या लहरी बरोबर अन विविध पक्षांच्या किलबिलाटसह बाबासाहेबांना लगेच जाग आली….बाबासाहेब उठून बसले…खिडकीतुन बाहेर बघत असताना ते तपकिरी तांबटसर सोनेरी किरणे जणू  बाबाना वंदनच करत होते…आणि म्हणत होते बा..बा..आज तुमचा नवा जन्म होतोय….

बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता , कारण अवघ्या दोन ते तीन तासामध्येच १९३५ ला येवले येथे बोललेले शब्द बाबासाहेब प्रत्यक्षात खरे करुन दाखवणार होते..

बाबासाहेबांनी त्या थंड्यागार गारव्याच्या साक्षीने स्नान उरकून घेतले सोबतच माईसाहेबही तयार झाल्या…

दोघांनीही पांढराशुभ्र पेहराव परीधान केला….हातात नेहमीचीच काठी…तुडूंब भरलेला तो परीसर आपल्या बापाची आतुरतेने वाट बघत  होता…चार  – पाच दिवसापासून भिमअनुयायी आपल्या चिल्यापिल्यासह या नागपूर शहरी आलेले होते…. सर्वांच्या नजरा मुख्यद्वाराकडेच लागून होत्या… भंते चंद्रमणी महास्थवीर आणि इतर प्रमुख मान्यवर अगोदरच मंचावर येऊन पोहचले होते….

आणि एवढ्यात युगपुरुग महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कार मुख्य द्वाराजवळ येऊन पोहचली…

त्या तुडूंब भरलेल्या भिमसागरातून एकच लहर उठली…डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो… बाबासाहब तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है... अशा घोषणेने निळे अंबर दुमदुमुन गेले..एवढा अफाट जनसमुदाय बघून बाबासाहेबांना जणू बारा हत्तीचे बळ आले होते …त्यांचे काळीज सुपाएवढे झाले…  चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता…. (कारण या धर्मांतराला अनेक मंडळीकडून विरोध होता….)

बाबासाहेब समाजासाठी खरे उतरले होते, आपल्या समाजानी बाबासाहेबांच्या मानेवर मान टाकली होती.. समाज तेव्हा गरिब पण इमानदार होता….जीव गेला तरी चालेल पण ते कदापिही बाबासाहेबांना सोडू शकत नव्हते…… हा भिमसागर बघून बाबासाहेब स्वतः ला धन्य समजत होते….बाबासाहेब स्वतः शीच पुटपुटले कि, अरे..येवले येथे तर मी फक्त एकटाच म्हणालो होतो कि मी हिंदू म्हणून जन्माला आलो .,पण हिंदू म्हणून मरणार नाही ! आणि आज एवढा मोठा माझा हा समाज माझ्या एका हाकेवर माझ्यासोबत यायला तयार झालाय……या सारखा दुसरा विजय कोणताच नाही….!

असं म्हणत बाबासाहेब मुख्य द्वाराजवळून पयदल मंचाकडे निघाले होते. बाबासाहेबांच्या डोळ्यातून आनंद अश्रु गळत होते….चेहऱ्यावरचा महाआनंद अजूनच तेजमय दिसत होता…सोबत माईसाहेब चालत होत्या….बाबासाहेब मंचाजवळ कधी येऊन पोहचले हे खुद्द त्यानाही कळले नाही…. बाबासाहेब मंचावर चढले जनसमुदायांच्या घोषणा  जोरजोरात सुरु होत्या अख्खे नागपूर हादरले होते….अशा त्या पोटतिडकिने दिलेल्या घोषणा होत्या…. बाबासाहेब  आपल्या या लाखो अनुयायींना आता शांत बसा म्हणून हातानेच पालवत आहेत..सर्व जनसमुदाय बाबासाहेबांच्या हाताच्या इशा-याकडे बघून अगदी शांत झाला होता….

घड्याळात बरोबर सव्वा नऊ वाजले होते….बाबासाहेबांनी पुन्हा सर्वाना उभे राहा म्हणून हातानेच खुणावले सर्व जनसमुदाय उभा राहीला होता.. बाबासाहेबांबरोबर माईसाहेबही उभ्या राहील्या… आणि….भंते चंद्रमणी महास्थवीर हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकराना बुद्ध धम्माची दिक्षा देत आहेत… बाबासाहेब आणि माईसाहेब दोघेही तथागत बुद्धांच्या चरणी मस्तक ठेऊन त्रिवार वंदन करीत आहेत.. सोबत धम्मपिठावर यंशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, बी सी कांबळे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते….

प्रथमता बाबासाहेब आंबेडकरानी भंते चंद्रमणी यांच्या कडून त्रिशरण पंचशील ग्रहण करुन दिक्षा घेतली…आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जमलेल्या अंथाग जनसमुदायाला बावीस प्रतिज्ञा देऊन बुद्ध धम्माच्या ओटीत टाकले…

आणि…. ख-या अर्थाने खीतपत पडलेल्या लाखो  बांधवांना आशेचा नवा सुर्य किरण दिला….तेव्हा या अफाट जनसागरांच्या मनामनात  बाबासाहेबांचे प्रतिबिंब  उमटत होते…आणि सारी  धरणी – आकाश बुद्धं – सरणं – गच्छामी म्हणत सा-या भारतालाच जणू बुद्धमय करत होते…. अशी ही धर्मांतराची सोनेरी पहाट होती……

नमो बुध्दाय…… जयभिम……


One thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म क्रांती, “धम्मचक्र अनुवर्तन”

  • October 14, 2025 at 2:09 pm
    Permalink

    Its a great great pleasure to feel right now that i am writing about the persona that need no identification. Great to be have under constitution.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!