बारवी धरण ओव्हरफलो झाले.
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील एम आय डी सी चे बारवी धरण शनिवारी दुपारीनंतर ( ओव्हरफलो ) वाहू लागले. गेल्या अनेक दिवसांपासून बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची वाट बघत होते. आता बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला आणि औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा केला जातो.
बारवी धरण पूर्ण भरण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. या वर्षात मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाणी साठण्यास सुरुवात झाली. या वर्षात बारवी धरण लवकर भरेल अशी अपेक्षा होतीच. मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस कोसळल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पावसाने विश्रांती घेतली.
हवामान खात्याने ऑगस्ट महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मागील दोन – तीन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली म्हणून धरणातील पाण्याचा साठा पुन्हा वेगाने वाढू लागला. शुक्रवारी बारवी धरण ९८% पेक्षा जास्त भरले. आणि शनिवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बारावी धरणातील पाणीसाठा वाढायला लागला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दिलेल्या माहिती नुसार दुपार नंतर बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले असे जाहीर केले. सध्या धरणातून ४ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. एमआयडीसी ने शेजारील रहीवाश्यांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत. परंतु ठाणे जिल्ह्यातील पाण्याची चिंता मात्र मिटली आहे.