रमाबाई ते रमाई … त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
रमाबाई ते रमाई … त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला. रमाबाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होय. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी तसेच संपूर्ण समाज त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. तर बाबासाहेब त्यांना रामु अशी हाक मारत.
रमाबाई ते रमाई
बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत असंताना एकदा अचानक बाबासाहेबांना काही कामा निमित्त परदेशी जायचे होते पण रमाईला एकटं घरामध्ये कसे ठेवायच म्हणून बाबासाहेबांनी धारवाडचे त्यांचे मित्र वराळे यांच्याकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.
वराळे काका हे धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुलं खेळायलाच आली नाहीत. म्हणून रमाई वराळे काकांना विचारतात की दोन दिवस झाली मुले कुठे गेली आहेत खेळायला आली नाही. त्यावेळी वराळे काका म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे महिन्यासाठी अनुदान मिळते ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस तरी लागतील. त्यामुळे अजून तीन दिवस तरी ही मुले उपाशीच राहणार आहेत.
वराळे काका म्हणत असताना रमाई लगेच आपल्या खोली मध्ये गेल्या आणि रडत कपाटा मध्ये ठेवलेलं सोनं आणि हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांनी काकांकडे देऊन म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि सोनं ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून या मुलांना उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी काका त्या बांगड्या आणि सोनं घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात त्यावेळी मुल पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी होतात.. हे पाहून रमाई पण खूपच आनंदी होतात. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यावेळेपासून ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली.