कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची १२२ वी जयंती


उल्हासनगर : १५ ऑक्टोबर २०२४ 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी क्रांतीलढ्याचे सरसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची १२२ वी  जयंती. 

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, – २९ डिसेंबर १९७१) हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या चळवळीत प्रगल्भ, विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड होय. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते.  तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, “माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड यांचा असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षातील महत्त्वाचे स्थान दिसून येते. बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. ०२ मार्च १९३० च्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. अनेक आंदोलनांत बाबासाहेब आंबेडकरांना दादासाहेबांनी साथ दिली होती. समाजाविषयींचा त्यांचा कळवळा हा आंतरिक उमाळ्यातून आलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी जो व्यापक संघर्ष सुरू केला त्या संघर्षात बाबासाहेबांना साथ देण्यासाठी सुरुवातीच्या काळात पुढे आलेल्या दलित युवकांपैकी कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे एक होय. २० मार्च, १९२७ चा महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि २ मार्च, १९३० चा प्रत्यक्षात ३ मार्च, १९३० रोजी केला गेलेला नाशिक येथील काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह, या सत्याग्रहांमध्ये त्यांनी बाबासहेबाच्या बरोबरीने भाग घेतला होता. डॉ. बाबासहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या इतर चळवळीं मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात दादासाहेबांनी भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जात होते

१९३७ ते १९४६ या काळात दादासाहेब गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते.

१९५७ – ५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे नेते होते.  १९६२ ते ६८ दरम्यान ते राज्यसभेवर सदस्य म्हणून कार्यरत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!