डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भिमाई यांची जयंती
( खंडू अढांगळे, प्रतिनिधी उगवता सूर्य )
माता भिमाई रामजी सकपाळ यांचे जीवन आणि कार्य प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांना समर्थ साथ देण्याचे कार्य त्यांनी केले.
त्यांचे वडील धर्माजी पंडीत हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावचे एक धनाढ्य श्रीमंत महार जातीतील वजनदार सद्गृहस्थ होते. सैन्यामध्ये स्वकर्तृत्वाने व बहादुरीने सुभेदार हे मानाचे पद त्यांनी मिळविले होते. त्यांना भिमाबाई, बायनाबाई व गणपत अशी तीन अपत्ये होती. भिमाबाई ह्या त्यांच्या ज्येष्ठ कन्या. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी, १८५४ मध्ये झाला. त्या दिसायला सुंदर, उंच व भारदस्त होत्या. त्या बालपणापासून प्रखर स्वाभिमानी व हट्टी स्वभावाच्या होत्या. वडील लष्करात सुभेदार असल्यामुळे कुटुंबामध्ये शिस्त व नीटनेटकेपणा होता. महार जातीतील एक सुसंस्कृत व प्रतिष्ठित घराणे म्हणून त्यांच्या परिवाराकडे बघितल्या जायचे. त्यांनी आपले पंडित आडनाव बदलून त्यांच्या तालुक्याचे नाव मुरबाड यावरून त्यांनी मुरबाडकर हे नाव धारण केले. सुभेदार मुरबाडकर म्हणून ते त्यांच्या पंचक्रोशीत सुपरिचित होते.
आपल्या ज्येष्ठ कन्या भिमाबाई यांच्यासाठी अनुरूप स्थान शोधण्याचे काम सुभेदार मुरबाडकर करू लागले. त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत होती. लष्करात सैनिक असलेले रामजी मालोजी सकपाळ हे योग्य वर भिमाईसाठी ठरू शकतात, याची खात्री त्यांचे वडील सुभेदार धर्माजी मुरबाडकर यांना पटली. डिसेंबर १८६७ मध्ये त्यांचा विवाह अतिशय थाटामाटात संपन्न झाला. लग्नासमयी भिमाबाईंचे वय १३ व रामजींचे वय १९ वर्षांचे होते. भिमाबाईंच्या सासर घरची परिस्थिती जेमतेम होती. रामजींच्या तुटपुंज्या पगारावर मोठं कुटुंब असलेल्या खर्चाची मिळवामिळव करतांना नाकीनऊ येत असे. एकदा त्यांच्या माहेरच्या एका स्त्रीने बोलून दाखवले, ‘भिमाबाईचे सासर घर अतिशय गरीबीचे. त्यांना मनासारखे दागदागिने व कपडालत्ता घेता येणार नाही. माहेरामध्ये वैभवात व सुखवस्तू परिस्थितीमध्ये राहिलेली भिमाबाई सासरघरी तिला हे वैभव उपभोगता येणार नाही.’ भिमाबाई प्रखर स्वाभिमानी व तटस्थ स्वभावाच्या. त्यांनी त्या खोचक प्रश्न विचारणा-या स्त्रीचा समाचार घेतला व म्हणाल्या, ‘अंगावर अलंकार घालून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन दाखवणे मला मुळीच पसंत नाही. मी माझ्या पतीच्या संसारामध्ये काबाडकष्ट करून सुख व समृद्धी प्राप्त करेल.’ आणि पुढील आयुष्यामध्ये भिमाबाईंनी खूप कष्ट केले. माहेरची श्रीमंती, मोठेपणा कधी कुणाला सांगितला नाही. बिकट प्रसंग आले. आपले पती पुण्याला कामानिमित्ताने गेले असतांना त्यांनी सांताक्रुझ या ठिकाणी समर्थपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. रामजीबाबा पुण्यावरून पैसे पाठवत असत, परंतु त्या तुटपुंज्या रकमेवर घर चालवणे जिकिरीचे होते. तेव्हा भिमाईने डोक्यावर टोपली घेऊन खडी टाकण्याचे काम केले. आपण करीत असलेल्या कष्टाची जाणीव आपल्या पित्याला होऊ दिली नाही. रामजी बाबांना शिक्षण घेण्याची ओढ होती. नोकरी करून त्यांनी पुण्यामध्ये शिक्षण घेतले. शिक्षकी पदाची परीक्षा पास झाल्यानंतर महु, मध्य प्रदेश येथे शिक्षक म्हणून लष्कराच्या शाळेत रूजू झाले. शिक्षकी पेशामधील त्यांची उत्कृष्ट कामगिरी बघून त्यांचे काही वर्षांत प्रमोशन झाले. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी पदभार स्विकारला. मुख्याध्यापक हे पद लष्करामध्ये सुभेदार रँकचे होते. रामजीबाबांचा सुभेदार रामजी सकपाळ या नावाने आदरपूर्वक उल्लेख होवू लागला. आता पगारात वाढ झाली होती. मान सन्मान वाढला होता. सुख समाधान ओसंडून वाहत होते. भौतिक सुखाला कमी नव्हती. भिमाबाईला आता माहेरची आठवण झाली. अंगावर दागिने घालून व उंचीवस्त्रे परिधान करून त्या आपल्या माहेरी मुरबाडला गेल्या. आपले पती रामजी यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ देवून जीवनाचे नंदनवन फुलवण्याचे काम भिमाईने केले. रामजीबाबा व भिमाई यांना गंगाबाई, रमाबाई, मंजुळा, तुळसा यामुली, तर बाळाराम व आनंदराव ही मुले होती. सर्वात शेवटी १४ एप्रिल, १८९१ मध्ये महु या ठिकाणी लष्कराच्या क्वार्टरमध्ये भिवाचा जन्म झाला. स्वभावाने भिवा आपल्या आईसारखा करारी बाण्याचा, स्वाभिमानी व दिसायला राजबिंडा. तो आपल्या आई सारखाच दिसायचा. परंतु आईचे प्रेम भिवाला जास्त काळ मिळाले नाही. अवघ्या सहाव्या वर्षी भिमाई आईचे छत्र हरविले. २७ फेब्रुवारी, १८९६ मध्ये भिमाईचे अकाली निधन झाले.
या महामातेच्या कुशीतून जन्म घेतलेला भिवा, पुढे या देशातील कोट्यावधी शोषित, पीडित, वंचित बहुजन जनतेचा उद्धारक म्हणून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने सुप्रसिद्ध होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या आईवर अतिव प्रेम होते. ब-याच वेळा भिमाईचे ज्या ठिकाणी दफन केले त्या ठिकाणी जाऊन रडत बसत. रामजीबाबा त्यांचा शोध घेत. त्या वेळी ते स्मशानभूमीमध्ये आईच्या दफनस्थळी अश्रू ढाळतांना दिसत. त्या वेळी रामजीबाबांना अश्रू अनावर होत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला निर्भीड बाणा, स्वाभिमानी वृत्ती, शील, सदाचार, कठोर परिश्रम हे गुण त्यांना आपल्या प्रिय आई भिमाईकडून मिळाले होते.
अशा या महामातेला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
💐💐💐 🙏🙏👏👏👏🙏🙏💐💐💐