३ जानेवारी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती.

03 जानेवारी, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती

त्या काळात एक व्यक्ती आपल्या पत्नीला सुशिक्षित करतो आणि तिच्याद्वारे ब्राह्मणांच्या मुली सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो , तेही कुठे ? तर त्या लोकांच्या बालेकिल्ल्यात… होय पूण्यात.
महार-मांग या वर्गातील लोकांसाठी शाळा स्थापन करून त्या चालविणे व इतर समाजबंधूंच्या बरोबरीने त्याना वागवीणे म्हणजे सिंहाच्या गुहेत प्रवेश करून त्याची आयाळ पकडण्यासारखेच होते.

जोतिबापेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. जोतिबां बरोबर तिने तिचे संपूर्ण जिवन त्यांना सहकार्य करण्यात व त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा सहन करीत घालवले.
उभ्या आयुष्यात जोतिबांना समाजाने अनेकवेळा छळले व दूर लोटले पण एका जीवाने मात्र त्यांना प्रथमपासून ते त्यांच्या अखेरच्या घडीपर्यंत साथ दिली. त्याना सोसाव्या लागलेल्या अपमानाचा व हालअपेष्टांचा काही भार आपल्या शिरावर घेऊन त्यांना वेळोवेळी सुखाचा, आनंदाचा, प्रीतीचा व औदार्याचा हात दिला. जगातील त्यांचा हा एकुलता एक सहकारी , मित्र व त्यांना अखेरपर्यंत साथ देणारा जगातील एकुलता एक जीव कोण असावा ? तो जीव, ती व्यक्ती म्हणजे त्यांची वीरपत्नी … क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होय.
जोतीरावांना एका शब्दाने कधीही न दुखविता त्यांना प्रत्येक कामात त्यांच्याबरोबरीने मदत केली. जोतीरावांच्या संसाराचा सारा भार सावित्रीबाईंवर होता. अतिथि सत्कार, जोतीरावांनी चालविलेल्या अनाथ मुलांचा सांभाळ तसेच महात्मा जोतीरावांनी दुष्काळात काढलेल्या अन्नछत्रालयातील कार्याचा भार, त्यांच्या शेतातील मालाची देखरेख , त्यांनी काढलेल्या पुणे विद्यार्थी वसतिगृहाची व्यवस्था आदि त्यांच्या प्रत्येक कार्याची धुरा आपल्या पतीबरोबर त्या अखंडपणे वाहत होत्या.
सावित्रींना अपत्य नव्हते पण त्याबद्दल त्यांना कधी दुःखाची आठवण झाली नाही. निराश्रित व अनाथ अर्भके हीच त्यांची खरीखुरी अपत्ये राहिली.
एकच शत्रू असे आपला
काढू पिटून मिळूनि तयाला
त्यांच्या शिवाय शत्रूच नाही
शोधून काढा मनात पाही
सांगते पहा दुष्ट शत्रूचे
नाव नीटरे ऐक तयाचे
…….अज्ञान
……. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
अश्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, ज्ञानज्योती, क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!
