माझा दादासाहेब म्हणजे शंभर नंबरी सोनं


माझा दादासाहेब म्हणजे शंभर नंबरी सोनं,…… डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे का म्हणाले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दादासाहेबांना एकदा शंभर नंबरी सोनं म्हणाले

दलित चळवळीतील एक महत्त्वाचे नाव, ज्यांनी संपूर्ण आयुष्य दलितांच्या हक्कासाठी व्यतीत केले. असे कणखर भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड. यांचा आज ४९ वा स्मृतिदन.

दादासाहेबांचा जन्म १५ ऑक्टोबर १९०२ रोजी नाशिक जिल्ह्यातील आंबेगावी एका शेतकरी कुटुंबात झाला. ते फारसे शिकलेले नव्हते, परंतु कोणत्याही सुसंस्कृत व सुशिक्षित माणसाला लाजवेल एवढे ज्ञान व नम्रता त्यांच्या ठायी होती.

समाजकार्याची आवड असल्याने वयाच्या २१ व्या वर्षी शाहू छत्रपती बोर्डिगमध्ये अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेऊन दादासाहेबांनी जीवनकार्यास सुरुवात केली. १९२६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाशिक येथे आले त्या वेळी त्यांचा मुक्काम शाहू छत्रपती बोर्डिगमध्ये होता. तेथे दादासाहेबांची बाबासाहेबांशी पहिल्यांदा भेट झाली. बाबासाहेबांना काय हवे व काय नको ही सारी व्यवस्था दादासाहेबांनी व्यक्तिश: लक्ष देऊन केली. दादासाहेबांनीही बाबासाहेबांना आपल्या मनोमनी आपले गुरू मानले होते. पुढे ही गुरू-शिष्याची जोडी सामाजिक व राजकीय क्षितिजावर दलितांच्या उद्धारासाठी जवळपास ३० वर्षे संघर्ष करीत राहिली व दलितांच्या संघर्षमय इतिहासात अजरामर झाली.

२० सप्टेंबर १९३७ रोजी वडाळा येथे नासिक जिल्हा युवक संघाने आयोजिलेल्या समारंभात दादासाहेब गायकवाडांना मानपत्र अर्पण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘मी यदा कदाचित माझे आत्मचरित्र लिहिले तर त्यात अर्ध्या पेक्षा अधिक भाग भाऊरावांचा असेल.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय जातीसंस्थेच्या विरोधात दादासाहेबांच्या बरोबर दलित चळवळीने जे काही अद्भुतपूर्व सत्याग्रह केले, त्यात एक म्हणजे, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, दुसरा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आणि तिसरा मुखेडचा सत्याग्रह. यापैकी काळाराम मंदिरचा लढा हा अनेक वर्ष सुरू होता.

दादासाहेबांच्या संघटन कौशल्यामुळेच काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रह १९३० ते १९३५ या काळात धैर्याने चालू शकला. कारण, त्यावेळी बाबासाहेब गोलमेज परिषदेच्या कामानिमित्त दीर्घकाळ भारतातून बाहेर होते. काळाराम मंदिरासह, मुखेड सत्याग्रहाची जबाबदारीही दादासाहेबांनीच समर्थपणे संभाळली होती. बाबासाहेबांना या गोष्टीचे फार कौतुक असायचे.

१४ एप्रिल, १९३७ ला येवला येथे झालेल्या सभेत दादासाहेबांविषयी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, काळाराम सत्याग्रहाच्या वेळी माझा भाऊराव गायकवाड प्रत्येक कसोटीवर १०० नंबरी सोन्यासारखा उतरला आहे. हे सोनं अतिशय शुद्ध आहे. सर्व प्रकारच्या आगीतून तावून सुलाखून निघून ते जसेच्या तसे शुद्ध राहिले आहे, तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे. हाच माझा उजवा हात आहे. त्याने सार्वजनिक कार्य, तुमची उन्नती, तुमची प्रगती हेच स्वत:च्या जीवनाचे ध्येय मानले आहे. त्याला अन्य जीवन नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हवालदिल झालेल्या दलित समाजाला दादासाहेबांनी अत्यंत समर्थ व प्रबळ नेतृत्व दिले. दलितांच्या न्यायासाठीच त्यांनी आयुष्य खर्ची केले. अशा या लढवैय्या नेत्याचे २९ डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले.

आज २९ डिसेंबर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा स्मृती दिवस.


पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन.


Translate »
error: Content is protected !!