डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा (बिंदू चौक) कोल्हापुरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा कोल्हापुरात ” बिंदू चौक ” येथे
आजच्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर १९५० रोजी सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने जगातील पहिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौक येथे उभारण्यात आला. हा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच उभारण्यात आलेला असून तो त्यांचा जगातील पहिला पुतळा आहे. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे.
भाई माधवराव बागल आणि शिल्पकार बाळ चव्हाण
तत्कालीन नगराध्यक्ष द. मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समिती कडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने भाई माधवराव बागल प्रभावित झाले होते. फुले, आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले. आणि ९ डिसेंबर १९५० ला त्यांचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले.
बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या लोकांतून भाई माधवराव बागल यांनी दोन सामान्य माणसांना हाताला धरून नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले होते. आज देशात सर्वधिक पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, मात्र ह्या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे.
पुतळा उभारल्यानंतर, एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे.