सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११२ वी जयंती
यशवंत भीमराव आंबेडकर
( १२ डिसेंबर १९१२ – १७ सप्टेंबर १९७७ )
भैय्यासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंत भीमराव आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे पुत्र होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.
यशवंत भीमराव आंबेडकर यांना भैय्यासाहेब या नावानेच ओळखत असत. १२ डिसेंबर १९१२ रोजी भैय्यासाहेबांचा जन्म झाला. भैय्यासाहेब यांनी सुरवातीला छोटे मोठे उद्योग सुरू केले पण नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. भैय्यासाहेबांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्याच प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले.
१९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन भैय्यासाहेब पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी याच प्रेस मध्ये छापले.
बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. त्याबरोबरच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.
भैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ते म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर करीत असत.
धार्मिक कार्य
६ डिसेंबर १९५६ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर भैय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. ‘मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरू केले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे घेतले. धम्मप्रचार सर्वत्र जोरात सुरू केला.
१९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सदस्य (आमदार) असतांना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नव बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून १४ वे दलाई लामा यांना बोलविण्यात आले. ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते. त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला व धम्मकार्य केले आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांचाच परिपाक आहे. १९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा ‘भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत’ असे गौरवोद्गार दादासाहेब गायकवाडांनी काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्त्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले.
भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली.
पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी केले तर २२ जून १९५८ रोजी उद्घाटन झाले.
मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. त्यावेळी भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम त्यांनी महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.
आज भैय्यासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. प्रज्ञासूर्याच्या या थोर पुत्रास विनम्र अभिवादन !