प्रसिद्ध उद्योगपति रतन टाटा यांच निधन. सर्वत्र दु:खाचा डोंगर
उल्हासनगर – १०.१०.२०२४
प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
टाटा उद्योग समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच ९ ऑक्टोबर, २०२४ रोजी मुंबईत निधन झालं. २८ डिसेंबर १९३७ साली जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला.
ज्यांच्यापुढे सर्वांनीच आदरानं नतमस्तक व्हावं अशा काही मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे रतन टाटा होय. ‘टाटा’ हे फक्त नाव नाही. तर तो विश्वास, विश्वासार्हतेला असलेला समानार्थी शब्द आहे. एक चकाकता हिरा म्हणजे रतन टाटा. भारतीय उद्योगविश्वाचा शिरोमणि असलेले रतन टाटा फक्त उद्योग जगता मध्ये नव्हे तर सर्व भारतीय समाजासाठीच आदर्श होते.
रतन टाटा हे ७ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. त्यासंदर्भात त्यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. मात्र मागील काही तासांत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता हलेकाय येथून नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. यावेळी एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.
दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.