उल्हासनगर येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला आंबेडकरी जनतेचा मोठा प्रतिसाद


उल्हासनगर – स्वराज्य संघटनेचे वतीने जाहीर व्याख्यान रविवार दि.०३ मे, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तक्षशिला विद्यालय, सुभाष टेकडी, उल्हासनगर ४ येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मा. निरंजन टकले आणि मा. किरण सोनवणे यांनी समकालीन सामाजिक प्रश्न, बदलती राजकीय परिस्थिती, संविधानिक मूल्ये आणि समाजासमोरील विविध आव्हाने यांवर सखोल मार्गदर्शन केले. दोन्ही मान्यवरांनी विषयाला पूर्ण न्याय देत उपस्थितांना विचारप्रवर्तक आणि अभ्यासपूर्ण मांडणी करून महत्त्वपूर्ण संदेश दिला.

कार्यक्रमाचे आयोजक स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महापुरुषांच्या जयंती केवळ नाच-गाण्यापुरत्या मर्यादित न ठेवता समाजाला बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रबोधन आणि विचारजागृतीच्या माध्यमातून साजऱ्या केल्या पाहिजेत. समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणणे हीच महापुरुषांना खरी अभिवादनाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर कार्यक्रमात आरक्षण उपवर्गीकरणालाही ठाम विरोध नोंदविण्यात आला. “माझा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध आहे” या संदेशाचा सेल्फी स्टँड हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. अनेक नागरिकांनी सेल्फी स्टँडसमोर छायाचित्रे काढून आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली. या जाहीर व्याख्यानाला हजारो नागरिक, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. कार्यक्रमाने सामाजिक जागृती, वैचारिक प्रबोधन आणि संविधाननिष्ठ समाजनिर्मितीचा संदेश प्रभावीपणे दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!