६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळांना सुट्टी जाहीर करा.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी असून देशभरात हा दिवस सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये या दिवशी अभिवादन, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात. तसेच आंबेडकरी अनुयायी व संपूर्ण समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जात असतात त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत जाणे व आणणे शक्य होत नाही. त्यामुळे उल्हासनगर शहरातील सर्व शाळेतील विध्यार्थ्यांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण व्हावा, सामाजिक समतेची जाणीव व्हावी तसेच बाबसाहेबां विषयी कृतज्ञता पूर्वक अभिवादन करण्यासाठी दिनांक ६ डिसेंबर रोजी उल्हासनगर शहरातील सर्व शाळेला सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी मा. प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर–३ आणि मा. गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, अंबरनाथ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कल्पेश उत्तम माने आणि मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

