अक्षता टाले ची नवी मालिका “बाई तुझा आशीर्वाद” उद्यापासून स्टार प्रवाह वर
“बाई तुझा आशीर्वाद” २७ एप्रिल २०२६ पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाह वर

उल्हासनगर मधील गुणी अभिनेत्री अक्षता टाले ही स्टार प्रवाह वरील बाई तुझा आशिर्वाद या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकणार आहे. अक्षताचे भूमिकेतील नाव अवनी असे असणार आहे.
२७ एप्रिल पासून ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अक्षताची ही “आनंदी” नंतरची दुसरी मालिका आहे. अक्षताने या नवीन मालिकेत एन्ट्री केल्यामुळे उल्हासनगरातून तिच्यावर सर्वत्र अभिनंदना चा वर्षाव होत आहे.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक प्रमोद टाले यांची अक्षता ही मुलगी, टाले यांचे मोठे चिरंजीव अभिषेक टाले हे आय ए एस अधिकारी असून ते गुजरात मधील बनासकाटा येथे कार्यरत आहे. अक्षता हिने नाट्य, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात अभिनय करण्याचा संकल्प केलेला आहे. “बाई तुझा आशीर्वाद” ही मालिका घराला घरपण देणाऱ्या स्त्रीच्या कथेभोवती फिरते. म्हणजेच बाईच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत करीत आहे.

कथेच्या सुरुवातीला ज्या घराला बाईच्या असण्याची सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि तिथून नात्यांचा नवा प्रवास सुरू होतो. अवनीच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही तर आपुलकी, संवाद, समज, आणि घरपण येतं.
या घराला घरपण देणाऱ्या अवनीच्या भूमिकेत उल्हासनगर मधे राहणारी अक्षता अनिता प्रमोद टाले ही नवोदित अभिनेत्री दिसणार आहे. प्रेक्षक आता या मालिकेची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतलेल्या अक्षताला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. सात वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली “स्टार” ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर “गुड बाय किस” “अत्तरमन” अश्या अनेक एकांकिका तिने केल्या. याच दरम्यान तिला “बाई तुझा आशीर्वाद” या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर, बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट मांडता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल. अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र तीला खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच स्वतःला व्यक्त करायची ही एक संधी आहे, असं अक्षताने आपलं मत व्यक्त करताना सांगितलं.

