संयुक्त महाराष्ट्र अंदोलन आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर
आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
” मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या मागणीतून ‘ संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.
सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.
डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे बाबासाहेब यांनी स्थापन केलेल्या ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)’चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला’ हे निर्भेळ यश मिळाले.
कॉ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे… आणि अश्या बऱ्याच जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले.
पण आज संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगितला जात असताना केवळ काही लोकांचा नावाचा गवगवा केला जातो. त्यांचे योगदान कुणीही नाकारत नाही, पण त्यांच्यासोबतच काम करणाऱ्या ”शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)” च्या दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळ, दादासाहेब रूपवते व अनेक मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो आणि त्यापेक्षाही वाईट याचे वाटते कि जो हा ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात लढला गेला त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कुणीही करत नाही !!
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरु असताना प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे यांना या लढ्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हा लढा यशस्वी झाला त्या डॉ. आंबेडकरांचे स्मरण केल्याशिवाय ” महाराष्ट्र दिन ” साजरा होऊच शकत नाही.
बाबासाहेबांच्या दादर, मुंबई येथील “राजगृह” या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची दिशा कशी असावी याचे मार्गदर्शन स्वतः बाबासाहेबांनी प्र. के. अत्रे, डांगे, प्रबोधनकार या मंडळींना केलेले आहे. या लढ्याची ज्योत कायम ठेवण्यासाठी ‘मराठा’ या वृत्तपत्रातून प्र. के. अत्रे जसे रान उठवत होते, त्याप्रमाणेच डॉ. आंबेडकर आपल्या ‘जनता’ मधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत होते. याच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढे दादासाहेब गायकवाड यांनी शोषित-वंचित-कष्टकरी मराठी जनांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी महाराष्ट्राला न देण्यासाठी मुंबईतील भांडवलदार, ज्यात जास्त अमराठी होते त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात केली. आणि त्याचवेळेस “मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या मागणीनेही जोर पकडला. त्याचवेळेस बाबासाहेबांनी ७ जाने. १९५६ ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला.
** मुंबईवर हक्क कुणाचा ?? **
मुंबई हि राज्याची अस्मिता आहे हे सर्वजण मान्य करत होते, पण ती का व कशी ? याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नव्हते. त्यावर बाबासाहेब म्हणतात–
” मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी ! जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहचू शकत नाही ? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ १५ % , पण ५० % हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता ? मुळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली व कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटीश राजा-दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती. “
( संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड-१०, पृष्ठ क्र. ८५, संपादक :- प्रदीप गायकवाड )
यावरून स्पष्ट दिसून येते कि संयुक्त महाराष्ट्रच्या लढयात बाबासाहेबांचे अमुल्य योगदान राहिले आहे. म्हणून यापुढे महाराष्ट्राचा इतिहास सांगताना इतरांसोबत बाबासाहेबांचे ही नाव घेऊन त्यांचा या कार्याचीही ओळख करून द्यावी, याचा सर्वांनी जास्तीत जास्त प्रसार करावा व बाबासाहेबांचे कार्य फक्त शोषित-वंचित समाजापुरते मर्यादित न करता बाबासाहेबांचे इतर महत्वाचे कार्यसुद्धा जगासमोर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत.
तसेच तुम्हा सर्व भारतीयांना १ मे या जागतिक कामगार दिनाच्या आणि “महाराष्ट्र दिनाच्या” खूप खूप शुभेच्छा !!
जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.
- – अँड जय गायकवाड